आरोग्य पाठीच्या कण्याचे
| |
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 01:02 PM IST
| |
|
| |
पाठीचा कणा हा अस्थी व मज्जा या धातूंपासून बनलेला असतो. अस्थी धातू, सांधे यांच्याशी वातदोष तर मज्जाधातूशी कफदोष संबंधित असतो. म्हणूनच पाठीच्या कण्याचे आरोग्य राखायचे असेल, तर वातदोषाला संतुलित ठेवणे, प्राकृत कफाचे पोषण करणे आणि हाडांना तसेच मज्जाधातूला आवश्यक त्या तत्त्वांची पूर्ती करणे आवश्यक असते. लवचिकता कायम राहण्यासाठी व्यायाम, योगासनेही महत्त्वाची होत.
श्रीरामांचे स्मरण करायचे झाले की, डोळ्यांसमोर कोदंडधारी रामच उभे राहतात. जसा कोदंडाच्या म्हणजे धनुष्याच्या जोरावर श्रीरामांनी रावणासारख्या अतिबलाढ्य राक्षसाचा वध केला. तसाच आपल्या शरीरात असणारा कोदंड म्हणजे मेरुदंड अर्थात पाठीचा कणा, ज्याच्या जोरावर आपण पूर्ण शक्तिनिशी निरोगी आयुष्य जगू शकतो. रामनवमीच्या निमित्ताने आपण आज पाठीच्या कण्याची काळजी कशी घ्यायला हवी याची माहिती करून घेऊ.
पाठीचा कणा शरीराला भरभक्कम आधार देत असतो. पाठीच्या कण्यातील ताकद जराही कमी झाली तर साधे सरळ उभे राहणेसुद्धा शक्य होत नाही. कंबरेच्या वरच्या संपूर्ण शरीराचा भार पाठीच्या कण्याद्वारा तोलला जातो. ताठ उभे राहणे, वाकणे, वळणे वगैरे सर्व क्रिया पाठीच्या कण्याच्या आधारानेच होत असतात. पाठीचा कणा 33 मणक्यांपासून तयार झालेला असतो. हे सर्व मणके एकावर एक रचलेले असतात. प्रत्येक दोन मणक्यांच्या मध्ये लवचिक व लुसलुशीत अशी लादी असते. पाठीच्या कण्याच्या आत मज्जारज्जू असतो, यातून निघणारे मज्जातंतू संपूर्ण शरीरभर पसरलेले असतात.
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाठीचा कणा हा अस्थी व मज्जा या धातूंपासून बनलेला असतो. अस्थी धातू, सांधे यांच्याशी वातदोष तर मज्जाधातूशी कफदोष संबंधित असतो. म्हणूनच पाठीच्या कण्याचे आरोग्य राखायचे असेल तर वातदोषाला संतुलित ठेवणे, प्राकृत कफाचे पोषण करणे आणि हाडांना तसेच मज्जाधातूला आवश्यक त्या तत्त्वांची पूर्ती करणे आवश्यक असते. लवचिकता कायम राहण्यासाठी व्यायाम, योगासनेही महत्त्वाची होत.
पाठीच्या कण्याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. संगणकावर काम करणाऱ्यांनी, सतत प्रवास करावा लागणाऱ्यांनी, लिखाणाचे किंवा बारीक कलाकुसरीचे काम करणाऱ्यांनी अधिक दक्ष राहायला हवे. खांदे-मान दुखणे, डोके दुखणे, कंबर दुखणे, पाठ-मान अवघडणे, उठता बसताना आधाराची गरज वाटणे यांसारखी लक्षणे जाणवत असल्यासही पाठीच्या कण्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे समजायला हवे.
कण्याची काळजी घेण्यासाठी...
वातदोष संतुलित राहावा, प्राकृत कफाचे पोषण व्हावे, अस्थी व मज्जाधातूला आवश्यक असणाऱ्या तत्त्वांची पूर्ती व्हावी, यासाठी पुढील उपाय सांगता येतील.
- मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. हे तेल जर विशेष औषधांनी संस्कारित केलेले असले तर ते त्वचेतून आतपर्यंत झिरपून मणक्यांच्या आतील मज्जारज्जूला व त्यातून उगम पावणाऱ्या नसांनाही ताकद देण्यास सक्षम असते. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल उदा. संतुलन कुंडलिनी तेल लावता येते. शक्य असल्यास 15 दिवसांतून एकदा तज्ज्ञ परिचारकाकडून विशेष मसाज (कुंडलिनी मसाज) करून घेणेही उत्तम.
जरी मानेचे वा पाठीचे दुखणे नसले तरी औषधांनी संस्कारित तेल अधून मधून मान-पाठीला लावत राहिले, तर पाठीचे दुखणे उद्भवणार नाही.
- नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी सहायक असते.
- रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वातातील असंतुलनामुळे पोट साफ होत नाही. पोट साफ झाले नाही, तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्यकतेनुसार अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेणेही आवश्यक असते.
- आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे - घरचे साजूक तूप, घरचे लोणी, दूध या दृष्टीने उत्तम असते. बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे अजून चांगले.
- मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे - खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते. कपभर दुधात चमचाभर खारीक पूड व थोडेसे पाणी टाकून, पाणी उडून जाईपर्यंत मंद आचेवर उकळणे व असे खारीक संस्कारित दूध प्यायले तर त्यामुळे पाठीचा कणा सुदृढ राहण्यास मदत मिळते.
कणा अशक्त, तर स्त्रिया त्रस्त
- स्त्रियांच्या बाबतीत पाठीच्या कण्याचे आणि गर्भाशयाचे जवळचे नाते असते. विशेषतः अंगावरून पांढरे जाणे किंवा पाळीमध्ये अतिरक्तस्राव होणे असे त्रास होत असले, तर त्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये अशक्तपणा पर्यायाने पाठदुखी, कंबरदुखी असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे स्त्रियांनी त्यांचे गायनिक आरोग्य व्यवस्थित राहण्याकडेही लक्ष द्यायला हवे. त्या दृष्टीने स्त्रियांनी शतावरी कल्प, धात्री रसायन, अशोकारिष्ट किंवा अशोक-ऍलो सॅन गोळ्या घेणे चांगले होय.
- मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे - पाठीचा कणा आणि मानसिक ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. ताणामुळे कण्याजवळील पेशी कडक झाल्या, तर त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते, पर्यायाने मानेचे व पाठीचे त्रास होण्याची शक्यता वाढते. मानसिक ताण आला तरी तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, संगीत ऐकणे, छंदात मन रमवणे यासारखे उपाय करता येतात.
- पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. यामध्ये सर्वप्रथम येते ते चालणे. रोज 30 मिनिटे नियमित चालल्यास पाठीच्या मणक्यांची, मणक्यांमधील गादीसारख्या डिस्कची लवचिकता नीट राहते, त्यामुळे मान-पाठीचे त्रास कमी होण्यास प्रतिबंध होतो.
याखेरीज सूर्यनमस्कार, ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसनेही मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.
- मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे याप्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा करता येतात.
- प्राणायाम, दीर्घश्वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गूंजनसुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक असते. प्राणशक्तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यासारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान 10-15 मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल.
- या खेरीज खुर्चीवर बसताना पाठीचा कणा सरळ राहील अशा स्थितीत बसणे, पाठीला पोक काढून किंवा अवघडलेल्या स्थितीत फार वेळ बसणे टाळणे, मानेवर किंवा पाठीवर जड ओझे न घेणे, फोनवर बोलताना मान सरळ राहील याकडे लक्ष ठेवणे, झोपताना फार जाड उशी न घेणे, तसेच फार मऊ गादी न घेणे, फार जड वस्तू वाकून ओढण्याचा किंवा उचलण्याचा प्रयत्न न करणे, स्त्रियांनी पाळीच्या दिवसांत शारीरिक श्रमाची कामे न करणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी ध्यानात ठेवल्या तर पाठीचा कणा निरोगी राहून आरोग्याचा आनंद घेता येईल.